सत्य अनुभव
⚉ मुंबईत मूळ रस्त्यात अगदी मधोमध एका व्यक्तीची प्रॉपर्टी होती. जुनेपण मोठे असे कौलारू छप्पराचे घर होते. एकत्रित कुटुंब पद्धतीत राहणारे मराठी कुटुंब होते. परंतु त्यांच्या घरी दरवर्षी नियमित एखादी व्यक्ती मृत्यू पडत असून घरी सुतक चालूच असे. माझ्याकडे प्रकरण आल्यावर नाथांचा आदेश घेऊन, मी त्यांच्या घरी त्या कुटुंबाला भेटायला गेलो.
त्यांच्या दारात एक भला मोठा वृक्ष होता. जणू तो सर्व घटनांचा साक्षीदार होता. मी त्यावर हात ठेवून मंत्र म्हणायला सुरुवात केल्यावर ते झाड खूप हालयला लागले. जोरात सोसाट्याचा वारा सुटला व ते झाड कण्यायला लागले. मला त्यांचे विवळणे कळत होते. त्याला फारच वेदना होत होत्या. त्या झाडाने त्या कुटुंबाचा इतिहास पाहिला होता. तो क्षण खरोखरीच भारावून टाकणारा होता. माझ्यासोबतचे सारेच आश्चर्यचकित झाले होते. कारण इतक्यावर्षात ते झाड कधीही कणून विवळलेले नव्हते. मी ठीक आहे, असे म्हणत त्या झाडावरचा हात काढला व त्या कुटुंबासोबत त्या घरात गेलो.
घरात गेल्यावर मी त्यांच्यातील एकाला विचारले की, तुम्ही या घरचे मुस्लिम पद्धतीने वास्तु बंधन करून घेतले आहे का? त्यावर ती व्यक्ती म्हणाली की, नाही आम्ही खरंच तसे काही केले नाही! पण माझे संकेत हे खोटे नसणार हा माझा ठाम विश्वास होता. तुमच्यापैकी कुणी कोंबडीच्या अंड्यावर काजळ लावून कुठे ते ठेवले आहे का? हा माझा प्रश्न त्या कुटुंबीयांना होता त्यावर पुन्हा नाही असे उत्तर मिळाले.
सुरुवातीला हे सर्व जवळजवळ खोटे बोलतात हा माझा अनुभव मला सांगत होता. इतक्यात आतून काका बाहेर आले व मला विचारले, तुम्ही काय प्रश्न केलात त्यावर मी पुन्हा तोच प्रश्न केला. त्यावर काका म्हणाले, हो मी स्वतः वरील क्रिया एका बंगाली बाबांच्या सांगण्यावरून केली होती.
हे उत्तर मला अपेक्षित होते. फार वाईट झाले, ठीक आहे, नाथ त्यातून आपल्याला नक्की मार्ग देतील. मला एक वाटी तांदूळ व थोडा कापूर द्या. मी घरातील व्यक्तींना सांगितले, आणि आमच्यात बसलेल्या त्या अज्ञात अदृश्य शक्तीने आमच्या सर्वांदेखत चुटक्या वाजवल्या. जणू ती मला आव्हान देत होती. हे दृश्य याची देही याची डोळा सर्वांनीच पाहिले, आणि प्रत्येकाची भंबेरी उडाली. घरातील स्त्रिया कावऱ्याबावऱ्या झाल्या. त्यांना दिलासा देत मी वरील साहित्य मागविले त्याप्रमाणे त्यांनी ते मला आणून दिले. ते मी त्या घरातील मेजवर ठेवले. त्या वाटीतील तांदळावर कापूर टाकला व पेटवला त्यावर माझ्या जवळ असलेली नाथांची सिद्ध विभूती टाकून मंत्र म्हणायला सुरुवात केली आणि...
त्या वाड्यातल्या स्वयंपाक घरातून सर्व भांडी धडाधड खाली आपटू लागली. माझ्या मंत्राचा प्रभाव त्या शक्तीवर होत होता. ती शक्ति अस्वस्थ झाली होती. खरं तर त्या शक्तीचा यात दोष नव्हता, कारण त्या घरातल्या कर्त्या पुरुषाने त्यांची घरी येऊन त्यांना आपल्या घरी येण्याचे आमंत्रण दिले होते. चुकीच्या उताऱ्यामुळे हा जीवघेणा प्रकार घडला होता. आणि त्यामुळेच त्या घरातील एक व्यक्ती एका वर्षाला बळीच्या रुपात ती शक्ती हक्काने घेऊ लागली. कारण त्या शक्तीचे आमंत्रण केले होते. परंतु त्यांच्या भोगाचा विचार केला नव्हता. परंतु नकळतपणे घडलेल्या चुकीची दुरुस्ती करण्याची वेळ आली होती. नाथांच्यापुढे साऱ्या शक्तीनाच नमन करावे लागले आहे. तेव्हा या शक्तीचा बचाव शक्य नव्हता.
मी तुम्हाला तीन दिवसांची मुदत देतो, या दरम्यान तुम्ही नाथ याग करुन वास्तू बंधन करून घ्या. असे मी त्या घरच्या मंडळींना सांगितले मी त्यांना एक नारळ अभीमंत्रून दिला व घराच्या प्रवेशद्वारावर ठेवण्यास सांगितले. याची मुदत केवळ तीन दिवस आहे. त्या दरम्यान आपण योग्य तो निर्णय घ्यावा. असे सांगून मी माझ्या शिष्यतुल्य व्यक्तींबरोबर त्या वास्तूतून बाहेर निघालो.
दुसऱ्या दिवशी मध्यस्थांच्या मला फोन आला, महाराज कालचा प्रकारातील नवनाथ यागाचे व वास्तू बंधनाचा खर्च किती येणार. त्यावर मी त्याला त्या वेळेचा खर्च सांगितला. थोड्यावेळाने त्या यजमानांचा फोन आला किती खर्च येणार मी तीच रक्कम सांगितली. त्यावर आम्हाला मध्यस्थीने आपल्या रकमेच्या तीन पट सांगितले आहे. मला हे सर्व अपेक्षित होते. त्यापुढे तीन दिवस होऊन गेले परंतु कोणाचाही फोन आला नाही. सर्व मुसळ केरात आता काही खरं नाही मी आपल्या मनाशी बोलत होतो.
पंधरा दिवसानंतर तो मध्यस्थ माझ्याकडे आला सर्वप्रथम मी त्याला झालेल्या प्रकाराबद्दल फैलावर घेतले व अशी दलाली माझ्याकडे चालणार नाही असे खडसावून सांगितले. माफी मागत या मध्यस्थाने झाल्या प्रकाराबद्दल दिलगिरी व्यक्त केली. महाराज आपण ज्यांच्या कडे गेला होता, त्यांच्याकडे एकाचा मृत्यू झाला आहे . तुम्ही दिलेल्या मुदतीनंतर त्यांच्या दरवाज्यात एक काळी कभिन्न मांजर आली व तिने विचित्र आवाज करताच आपण दिलेला नारळ वरून खाली पडला व त्याचे दोन तुकडे झाले. पुढील तीन दिवसात त्यांच्या घरात मयत झाले. आता काय करावे? हे त्यांना कळत नाही, आपण काही उपाय सुचवा!
या आधीच उपाय सुचविला होता. परंतु त्यांचे नशीब, जिथे माझ्या नाथावर विश्वास नाही तिथे मी काय करणार?
आज मीतिस घरातील एक दोन पुरुष उरलेत, कारण त्यांनी ती वास्तू सोडली व बाजूच्या बिल्डींग मध्ये ते राहायला गेलेत. आता म्हणे कोणी बिल्डर ती पीडित वास्तू मोडून तिथे टोलेजंग इमारत उभी करण्याचे मनसुबे आखत आहे. पण त्यातही त्याला यश नाही. समजा अशी वास्तू उभी राहिली तर तिथे लाखो रुपये कर्ज काढून एवढा अवाढव्य खर्च करून ज्याने फ्लॅट घेतला. तर तो त्याला फलदायी ठरेल का ? कदाचित काहीही घडू शकते.
पैशाच्या व्यवहारात मनुष्य देवाची देखील बोली लावतो. एकूण कामाचे पॅकेज मागणारी लोक मी माझ्या कारकिर्दीत पहिली आहेत. पैसे मोठे कि माणूस मोठा हे ज्याने त्याने ठरवायचे असते. जान हैं तो जहाँन है.